आतापर्यंत कित्येक आव्हानांना सामोरा गेला माणूस...
पण
आजपर्यंत पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न,
अस्तित्वाचा,
आयुष्याचा,
"जगण्याचा...!"

Tuesday, April 29, 2014

माळा

उन्हात कोरड्या पडलेल्या नदीला कारंज़ं फुटावं तसे शब्द सुचतात. तापलेल्या दगड गोट्यांतून भुसभुसलेल्या मातीतून ओल पाझरत नेतात आणि सगळं पाणी साचून राहतं दगडी बांधामागे. ढेकूळ बुळुक्कन उड्या मारतात, शेवाळ माज़तं, ओंडके कुज़ून काळे होतात, लाकूड हलकं होतं तीन दिवसांचं प्रेत, बगळ्याला आधार म्हणून. मी ते भाज़लेले-पोळलेले कागद घेऊन शिडीवरनं, माज़घरातल्या माळ्यावर चढतो. हातातलं सगळं सांभाळत, एका हातानं शिडीचा उभा बांबू धरून, ज़वळ ज़वळ माझ्या इतक्याच उभ्या शिडीवरचा समांतर तोल ढळू न देता, एक एक खाना चढत ज़ातो. तिसरा आडवा बांबू थोडा, म्हणजे इंचभर हलतो, तो आहे तोल ढळावा म्हणून. माळ्यावरून कवडसा फळकुटांच्या जमिनीवर अदळुन फुटतोय, झाकोळलय सगळं. मी डोकं वर काढतो, विहिरीच्या फुटक्या लाकडी गडगड्याला सरकवून, मी चौकोनातून वर येत हात टेकवतो, पंजे धुळीनं माखतात, त्यावर तसाच भार तोलत मी धड वर ओढून घेतो, खाकी चड्डीतलं बूड टेकवतो. बस्स!

उतरत गेलेल्या छतापर्यंत वस्तूंचा भरणा आहे, उठताना जरा लक्ष गेलं की खापरं, वरून माकडं फिरल्यासारखा आवाज करणार. हात घालून बघायचा तो मधोमध धुळेल काचेतून सतत झरणारा कवडसा. श्वासातनं ती धूळ हुंगायची. अडगळीत खजिना शोधायचा प्रयत्न करायचा, अनेक वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या माणसांनी कारणा कारणांनी भिरकाऊन दिलेल्या पण टाकून न देता पडू दिलेल्या दुर्लक्षित, उपेक्षित आणि कसल्याश्या हव्यासानं केवळ साठवण करून ठेवलेल्या, अडगळ ठरलेल्या गोष्टी आणि वस्तू! त्यांना धूळ आहे, उंदरांच्या लेंड्यांचे, मुताचे वास आहेत, पावसाची ठिबकणारी गळती आहे, कोंदट-दमट हवेला उब देणारा कवडसा आणि धुळीला सोन्याचं मोल देण्याचा रोज़चा खोटा खेळ आहे. मी आल्याचंही ज़ाणवलं असेल. आता कांही वस्तूंची हालचाल होणार, कांही वस्तू खाली ज़ाणार. काहींच्या गोष्टी होणार. कांही परत येऊन पडणार, त्यांची त्यांची योग्य वेळ येईपर्यंत. आपापलं बोलावणं येईपर्यंत, तलाठ्यानं म्हातारीला पळवून लावावं तसं. ती वाट बघणार.

मला तरी धूळ कशी परकी असेल? सगळीकडे ती आहे, वेढून बसलीय भोवताल. मी एक एक वस्तू काढून बघतो. ज़ुन्या फळ्यांमागं रद्द्याच्या भींतीतून गळून पडलेल्या ढेकळां मधून कांही-बाही बाहेर येतं, तपकिरी एकांत सोडून बेरंग चपटे किडे सरसरून गोल रिंगण घेत दुसऱ्या खाचांमधे जातात. मरून पडलेल्या पालीची काळपट्लेली सुकी कातडी तुटक्या छडीनं डिवचून बघायची असते. मग सापडलेली लूट, कुज़क्या कुरतडलेल्या मोठ्या कापडी पिशवीत भरायची. गडगडा जड आहे, तो वेगळा नेला पाहिजे, अजून एका फेरीत. सगळं सोडून परत ज़ायची वेळ ज़वळ येत चाललीय. रडावंसं वाटतंय. मिळालेल्या वस्तूंचं काय करू काय नको कळेनासं झालंय. अनावर होऊन मी पिशवीत माझे कागद कोंबतो आणि भिंतीकडे तोंड करून एक एक बांबू करत, शिडी दोलायमान होत असताना, एकदा तर तोल ढळून शिडी इंचभर उचलली सुद्धा.

खाली पायात तीन-चार इंचंच पाणी असेल. मी हात टेकला आधाराला तर ओल गेलेली भिंत होती. शेज़ारच्या गिरणीतनं आमच्या मज़घरापर्यंत भिंतीला पाडलेला भोसका. तो पिठानं माखला होता. हात घातला की इकडून पार पलीकडे जायचा. भिंतीला समांतर भिंतीतून सर्वत्र पसरत ज़ाणारी बिळं. गिरणीची घरघर. माज़घर. घर घर. पाणी. गळती. आवाज़. अचानक पाणी शिरल्यानं खालून भिजून गरम झालेलं अंथरूण. पळापळ, पेंग. तुंबलेलं गटार. शहापुरचा मास्टर-प्लॅन. पाच फूट ज़ागा, घर दुकान. नुसताच गडगडा.
मी कलता होऊन पायाच्या अंगठ्यानं शेवाळ कुरवाळतो. तापलेली दुपार ढळताना, नदीच्या पाण्याचा गार-मृदु स्पर्श. ओढाळ पाचोळा, हिरव्या सावल्या. कवडसे; पानांतले, काचेतले, तुळ्यांवर भार टाकून बसलेल्या फळ्यांवर आदळून फुटणारे, पाण्यात चमकणाऱ्या सुर्यबिंबाचे, तोंडावरल्या धुळीवरच्या, परावर्तित प्रकाशाचे. धुळीला आणि पाण्यावरल्या तरंगांना कुरवाळणारी बोटं. गुढघ्यातला ताण. खापरांवर रपारप पडून, पन्हाळीनं खाली बदबदत येऊन मातीत न मुरणारा पाऊस. कोरड्या-कृश नग्न नदीला तलम जल-वस्त्रानं कामोत्तेजित करणारा, जीवंत ठेवणारा, झरा, पाणी, धूळ, वस्तू, गोष्टी, मी.


- लक्ष्मीकांत






© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “Jagane.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

No comments:

Post a Comment