आतापर्यंत कित्येक आव्हानांना सामोरा गेला माणूस...
पण
आजपर्यंत पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न,
अस्तित्वाचा,
आयुष्याचा,
"जगण्याचा...!"

Tuesday, July 7, 2015

॥ रातराणी ॥
       माझी ती इच्छा आज पूर्ण झाली... मधे एकदा आईला बागेत उगाच आडव्या फोफावलेत्या एका झाडाबद्दल विचारलं होतं; आई म्हणाली “परवाच लावलीय रातराणी!”. हे ऐकण्या आधी मी, हे काय वाढलं आहे ते उपटून टाक आधी ह्या टोन मधे सांगायला गेलो होतो आणि रातराणी म्हटल्याबरोबर शरणागती. प्रजक्त, रातराणी, जाई-जुई, चाफ़ा; कांही केल्या ह्या झाडांचं आकर्षण टळतच नाही. दुर्गा भागवतांचा “दुपानी” या लेखसंग्रहात भरतीय मनाला असलेल्या ह्या सुगंधच्या वेडाबद्दल सुंदर लेख आहे.
       मधे एकदा ती रातराणी जरा फुलारली, वास येतो न येतो अशी! एरव्ही हा स्वभाव प्रजक्ताचा. पण प्रजक्त तेंव्हा जोरावर होता. आधीच आडदांड झुडूप ते, दिवसा बघितलं तरहे असलं रूक्ष झाड बागेत कोण कशाला लावेल असा प्रश्न पडावा आणि रात्री वेडावून सोडणाऱ्या वाऱ्यानं झोप उडवावी असं. त्या मानानं रातराणी हिरवीकंच असते, अत्यंत पाणीदार गर्द रंगाची. अगदी अंगाला हात लावू देत नाही. चुकुन माकून रातराणीच्या फांदीला हात लावून बाज़ूला करण्याचा प्रसंग आलाच तर हलक्याश्या धक्क्यानं मोडून हातात येते. राणीच ती, आम्हाला कशाला हात लावू देतेय?
       पण आज गेट मधून गाडी आत घेतोय तो रातराणीनं एकदम घेरलंच. वा! वा! वा! डोळे मिटून घेतले, तो, गंध ऊरभर पिऊन घेतला. दुसरं कांही सुचेचना! वेडावल्यासारखं झालं सगळ्या मित्र-मैत्रीणिंची आवर्जून आठवण झाली. त्यांनाही हा वास नक्कीच आवडला असता! समानधर्मी लोकांची कधी आठवण होईल हे सांगता येत नाही आणि कुठे नात्यांची सावली बोलून जाईल हेही. मला नेहमी असं वाटतं की प्रजक्त-रातराणी खूप नखरेल असतात. त्यांचा सुगंध साठवता येत नाही, आणि त्यांची नक्कलही करता येत नाही. रात्री फुलणाऱ्या ह्या फुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी पहावं तर त्यांच्यात अगदीच जीव नसतो. प्राजक्ताची फुलं बरी तरी दिसतात, पण रातराणी ? ती मोगऱ्याचं फूल काढल्यावर शिल्लक राहिलेल्या देठासारखी दिसते. ही असली रातराणी बघू नये, फक्त रात्रभर हुंगावी मनभर...!
       बकुळ कशी आठ-पंधरा दिवस टिकते, माळ सुकली तरी वास तसाच राहातो, पण तो वास असतो मात्र खूप कोरडा. रातराणीचा वास ओलसर असतो. हवेत आर्दता जास्त असताना ही फुलं उमलतात. ह्या वासानं वारा सुद्धा सुस्तीत फिरतो. उगाच धसमुसळेपणा कर, जोरानं वाहा हे त्याचे नेहमीचे चाळे कमी होतात. म्हणूनच रातराणी राज्य करते. म्हणूनच कदाचित मराठी कवितेत रातराणी आणि प्राजक्त रूपकांचे असंख्य साज़ लेवून वावरताना दिसतात. सुरेश भटांच्या दोन ओळींचा उल्लेख अनिवार्य आहे.
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा । रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ॥
       रात्रीचं गांभिर्य बळावत असताना रातराणी फुलते. प्रजक्त हा रात्रीचा बालसखा, तो कडूसं पडलं की घमघमायला लागतो पण रात्र जशी घनघोर होते तसा तिचा कब्जा रातराणीच्या ताब्यात जातो. इतर सगळे वास मागे पडतात. सगळ्या भावना मागे पडतात. आणि रातराणी रात्रीवर स्वार होते.
       सुगंध हा सुद्धा संस्कार आहे! बुधल्यात बंद रसायनांनी धुमसणाऱ्या सेंट्स चा वास आवडणाऱ्या लोकांना हा गंधाळलेपणा कदाचित रुचणार नाही. कृत्रिम वास किती दिवस टिकतो यावर श्रेष्ठ ठरतो पण निसर्ग मात्र ज़राशी सलगी करून, मग हुलकावण्या देत रहतो, खऱ्या-खुऱ्या आयुष्याचं रूपेरी देखणेपण आणि तीतकच खरं नश्वरतेच जीणं समजावत. अत्तंरं, पर्फ़्यूम्स आपण लावलेला सुगंध लोकांपर्यंत पोचावा म्हणून असतो. पण इथे रातराणी आपल्याला घेरून घेते, प्राजक्त मनाला मिठी मारतो! जाई-जुई हितगुज आठवायला भाग पाडतात, मरवा, चाफ़ा आपल्याला प्रीयजनांच्या जुन्या आठवणीत अलगद नेऊन सोडतात. मजा म्हणजे मला नेहमीच निसर्ग जवळ हवा असतो. घरात सुद्धा प्रत्येक गोष्टीत निसर्गाच्या प्रतिमांचा वावर असावा असं वाटतं. माझ्या बेडरूम मधे मला पाना फुलांचे, उजळ पडदे आवडतात. त्या पडद्यांना हेलाकावा देवूनच माझ्या खिडकीतून गार वारा येतो. हलकाच! दार उघडं असेल तर त्याला जोर असतो, दार बंद असताना मात्र तो अगदी दबक्या पावलांनी आत शिरतो. आणि मागोमाग हे गंधभारही, हातात एखादं पुस्तक घेउन खिडकीला लागून असलेल्या माझ्या खाटेवर मी उशीवर रेलून आडवा झालेला असतो, तेंव्हाचं ते सारं जगच निराळं असतं!
       त्यातही खंत एव्हडीच की ती रातराणी आणि प्राजक्त हॉल समोरच्या बागेत आहेत आणि मझ्या खोलीच्या खिडकीवर जूईचा वेल चढवलेला नाही, कारण तिथून आमची हद्द संपते... आता माझ्यासाठी शेजारी क्रूर वगैरे असतात, त्यांना भावनांची कदर वगैरे जाणीव नाही. मी हे आईला बोलून दाखवतो, “माणूसकी नाही साधी... बाकीचे अवयव कुठले असायचे?” असं उत्तर मिळतं! असो. बाकी हवं ते आहे, थोडं लांब का असेना, वास येतो तेव्हडा पुरे अजून जास्त अपेक्षा जरा जास्त होतील. हे म्हणजे प्रत्येक आवडलेल्या मुलीला मीठी मारता यावी किंवा सगळ्या मित्र-मैत्रिणिंनी मिळून एकच घर बांधून एकत्र राहावं या इतकीच ’अतिरेकी’ अपेक्षा ठेवल्यासारखं झालं.
       पण सुगंध येतोच आहे, अपेक्षाही ठेवायला काय जातं? पूर्ण न का होवोत - न होवोत अपेक्षा ठेवायला काय जातं? पूर्ण न व्हायच्या भितीनं स्वप्नं न बघण्यापेक्षा, न का होईनात पूर्ण पण स्वप्नं बघायला काय हरकत आहे? खिडकीतून फुलांचे पांढरे बिंदू न का चमकेनात पण त्यांचा वास तरी येतो. किती सुगंधी फुलं फुलतात? म्हणून घमघमाट थांबत नाही, फुलणं थांबत नाही! कधी कधी चंद्र जातो डोकावून खिडकीतून! बरं वाटतं. वर्षातून एक-दोनदा त्याला माझी आठवण होते, मग चांदणं सुद्धा आत येतं, रातराणीचा गंध माळून.
       मनात आठवणींचा थवा उतरतो... रात्र रात्र जागून काढलेली आठवते, अपरात्रीच्या गप्पा आठवतात. एकमेकांसाठी काय काय करायच्या थापा आठवतात, आणि अनेकदा नकळत एकमेकात गुंतून गेलेलं आठवतं! माझ्या एका अर्धवट राहिलेल्या कवितेत एक ओळ होती,
ओढ मोठी विचित्र असते,
कारण, ती नुसतीच असते
       साध्या साध्या गोष्टींनी किती फ़रक पडतो ते आठवतं, बरं वाईट सगळंच अशावेळी आठवतं.... अनेक माणसं जोडलेली आठवतात, कांही जिवलग म्हणून हितगुज करून निघून गेलेलीही आठवतात... कांही सोबतीला आहेत, कांही आपाल्या वाटेने निघून गेलेत... आपलं चुकलं, दुसऱ्यांचंही चुकलं; पण वेळ पाहून आपण त्यांना पोटाशी धरलं नाही, हे आपलंच चुकलं!

       पण तरीही आपली ओंजळ अगदीच रिकामी नाही! रातराणी सापडली नाही, प्राजक्त नाजूक असल्यानं हाती आला नाही, पण मोगऱ्याची एक-दोन फुलं हाती आली; ती ही कांही कमी नाहीत... हाती आलं ते आहेच, दूर आहे ते अजूनही गंधाळतय मनाला, आपल्या गालांना अलगद स्पर्षून जातंय! गार गंधभरल्या वाऱ्यासोबत येऊन केसांना कुरवाळून जातंय हे काय कमी आहे? रात्र आता भिनलीय! जागून काढली ती काढली आता मात्र ह्या खुळावणाऱ्या वासानं तिच्या मिठीत शिरायला जीव आतूर झालाय! तरीही, रात्री (की पहाटे?) साडेतीन-चारच्या सुमाराला, अजून कुठल्याच गंधवाऱ्याचा उन्माद ओसरला नसताना, गारठा वाढत जाऊन, रातराणी-प्राजक्ताची मिठी जराही सैल झाली नसताना मनात विचार येतो; खूप झाला वेडेपणा, वेळेवर झोपणं चांगलं!


Tuesday, April 29, 2014

माळा

उन्हात कोरड्या पडलेल्या नदीला कारंज़ं फुटावं तसे शब्द सुचतात. तापलेल्या दगड गोट्यांतून भुसभुसलेल्या मातीतून ओल पाझरत नेतात आणि सगळं पाणी साचून राहतं दगडी बांधामागे. ढेकूळ बुळुक्कन उड्या मारतात, शेवाळ माज़तं, ओंडके कुज़ून काळे होतात, लाकूड हलकं होतं तीन दिवसांचं प्रेत, बगळ्याला आधार म्हणून. मी ते भाज़लेले-पोळलेले कागद घेऊन शिडीवरनं, माज़घरातल्या माळ्यावर चढतो. हातातलं सगळं सांभाळत, एका हातानं शिडीचा उभा बांबू धरून, ज़वळ ज़वळ माझ्या इतक्याच उभ्या शिडीवरचा समांतर तोल ढळू न देता, एक एक खाना चढत ज़ातो. तिसरा आडवा बांबू थोडा, म्हणजे इंचभर हलतो, तो आहे तोल ढळावा म्हणून. माळ्यावरून कवडसा फळकुटांच्या जमिनीवर अदळुन फुटतोय, झाकोळलय सगळं. मी डोकं वर काढतो, विहिरीच्या फुटक्या लाकडी गडगड्याला सरकवून, मी चौकोनातून वर येत हात टेकवतो, पंजे धुळीनं माखतात, त्यावर तसाच भार तोलत मी धड वर ओढून घेतो, खाकी चड्डीतलं बूड टेकवतो. बस्स!

उतरत गेलेल्या छतापर्यंत वस्तूंचा भरणा आहे, उठताना जरा लक्ष गेलं की खापरं, वरून माकडं फिरल्यासारखा आवाज करणार. हात घालून बघायचा तो मधोमध धुळेल काचेतून सतत झरणारा कवडसा. श्वासातनं ती धूळ हुंगायची. अडगळीत खजिना शोधायचा प्रयत्न करायचा, अनेक वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या माणसांनी कारणा कारणांनी भिरकाऊन दिलेल्या पण टाकून न देता पडू दिलेल्या दुर्लक्षित, उपेक्षित आणि कसल्याश्या हव्यासानं केवळ साठवण करून ठेवलेल्या, अडगळ ठरलेल्या गोष्टी आणि वस्तू! त्यांना धूळ आहे, उंदरांच्या लेंड्यांचे, मुताचे वास आहेत, पावसाची ठिबकणारी गळती आहे, कोंदट-दमट हवेला उब देणारा कवडसा आणि धुळीला सोन्याचं मोल देण्याचा रोज़चा खोटा खेळ आहे. मी आल्याचंही ज़ाणवलं असेल. आता कांही वस्तूंची हालचाल होणार, कांही वस्तू खाली ज़ाणार. काहींच्या गोष्टी होणार. कांही परत येऊन पडणार, त्यांची त्यांची योग्य वेळ येईपर्यंत. आपापलं बोलावणं येईपर्यंत, तलाठ्यानं म्हातारीला पळवून लावावं तसं. ती वाट बघणार.

मला तरी धूळ कशी परकी असेल? सगळीकडे ती आहे, वेढून बसलीय भोवताल. मी एक एक वस्तू काढून बघतो. ज़ुन्या फळ्यांमागं रद्द्याच्या भींतीतून गळून पडलेल्या ढेकळां मधून कांही-बाही बाहेर येतं, तपकिरी एकांत सोडून बेरंग चपटे किडे सरसरून गोल रिंगण घेत दुसऱ्या खाचांमधे जातात. मरून पडलेल्या पालीची काळपट्लेली सुकी कातडी तुटक्या छडीनं डिवचून बघायची असते. मग सापडलेली लूट, कुज़क्या कुरतडलेल्या मोठ्या कापडी पिशवीत भरायची. गडगडा जड आहे, तो वेगळा नेला पाहिजे, अजून एका फेरीत. सगळं सोडून परत ज़ायची वेळ ज़वळ येत चाललीय. रडावंसं वाटतंय. मिळालेल्या वस्तूंचं काय करू काय नको कळेनासं झालंय. अनावर होऊन मी पिशवीत माझे कागद कोंबतो आणि भिंतीकडे तोंड करून एक एक बांबू करत, शिडी दोलायमान होत असताना, एकदा तर तोल ढळून शिडी इंचभर उचलली सुद्धा.

खाली पायात तीन-चार इंचंच पाणी असेल. मी हात टेकला आधाराला तर ओल गेलेली भिंत होती. शेज़ारच्या गिरणीतनं आमच्या मज़घरापर्यंत भिंतीला पाडलेला भोसका. तो पिठानं माखला होता. हात घातला की इकडून पार पलीकडे जायचा. भिंतीला समांतर भिंतीतून सर्वत्र पसरत ज़ाणारी बिळं. गिरणीची घरघर. माज़घर. घर घर. पाणी. गळती. आवाज़. अचानक पाणी शिरल्यानं खालून भिजून गरम झालेलं अंथरूण. पळापळ, पेंग. तुंबलेलं गटार. शहापुरचा मास्टर-प्लॅन. पाच फूट ज़ागा, घर दुकान. नुसताच गडगडा.
मी कलता होऊन पायाच्या अंगठ्यानं शेवाळ कुरवाळतो. तापलेली दुपार ढळताना, नदीच्या पाण्याचा गार-मृदु स्पर्श. ओढाळ पाचोळा, हिरव्या सावल्या. कवडसे; पानांतले, काचेतले, तुळ्यांवर भार टाकून बसलेल्या फळ्यांवर आदळून फुटणारे, पाण्यात चमकणाऱ्या सुर्यबिंबाचे, तोंडावरल्या धुळीवरच्या, परावर्तित प्रकाशाचे. धुळीला आणि पाण्यावरल्या तरंगांना कुरवाळणारी बोटं. गुढघ्यातला ताण. खापरांवर रपारप पडून, पन्हाळीनं खाली बदबदत येऊन मातीत न मुरणारा पाऊस. कोरड्या-कृश नग्न नदीला तलम जल-वस्त्रानं कामोत्तेजित करणारा, जीवंत ठेवणारा, झरा, पाणी, धूळ, वस्तू, गोष्टी, मी.


- लक्ष्मीकांत






© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “Jagane.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

घर





ललित रूप कर धारण
स्वरुप उग्र त्याग दो
- नंदन हेर्लेकर









ह्या माझ्या गुरूजींच्या ललितेला केलेल्या आळवणीला धाऊन आलेल्या पावसानं ओल्या झालेल्या अगदी गाभ्यातून जिवंत झालेल्या गच्चीवरल्या शेवाळावर चालताना डोक्यात मात्र व्याकूळ अस्वस्थता आहे. इथला गारवा, बेळगावचा, आयुष्याला सतत समांतर साथ देणारा पाऊस, माझी खोली, खिडकी सारं सोडून दूर जाण्याचे वेध लागलेत. कुठेतरी जीव अपार गुंतला आहे इथं पण तरीही ज़ाणवणारी एक गोष्ट आहेच की, देठापासून तोडून पुढं ज़ाणं ज़रूरीचं आहे.

माझ्या कपाटात विचरांचा कप्पा खूप छोटा आहे. अधे मधे मी थोडे फार कपडे आणि एक-दोन जीवापाड ज़पून ठेवलेली, चार पदचिन्हांसारखी, आठवणिंची बॉक्सं, किडुक-मिडूक वस्तू फेकून देतो आणि नव्या पुस्तकांसाठी जागा करतो, चार नवे आयाम गाठीला पडतात. त्यातही जुन्याचा स्थिर-स्थावराचा, आणि जंगमाचाही मोह सुटत नाही. अनावर असं पुढं ज़ाणं आहेच आहे, ते ही तितकंच खरं आणि सनातन आहे. पुढं ज़ाणं हे फर ढोबळ झालं. आपण पुढं-मागं कुठेच जात नसतो. कदाचित इथून उठून दुसरीकडं एव्हढंच काय ते.

उपमांचाच खण चाळत बसतो तेंव्हा असं दिसतं की फळातलं सुखाचं dependant जगणं बीजाला फोडावंच लागतं. बोधीवृक्षाच्या सिद्धफळात जन्मूनही, पुढे नव्या मातीत रुज़ावं लागतं. आपणच बी व्हायचं, झाड व्हायचं, कळी व्हायचं, फूल बनून झडायचं, आपणच आपल्याला बी म्हणून नव्यानं जन्म द्यायचा, शिवरीच्या जडत्वानं लहरत जाऊन मातीत रुतून रहायचं, रुज़वण करयची म्हणून.

भातं, भातं, शेतं, शेतं, सारं इथंच राहिलं आहे, बेळाच्या बुट्ट्या भरून धान्य मात्र न्यायचं. Lady GaGa म्हणते त्या प्रमाणं,
Love is just a history
That they may prove it
When you’re gone

आपलेच अस्तित्व-गुंड बांधून ठेवलेत सगळीकडे त्याला प्रेम प्रेम म्हणायचं. नाहीतरी असंख्य भावनांसारखी ती सुद्धा भावनाच आणि तिला हे महत्त असण्णं से पाप्त अनिवार.
पचण्ण चण्ण धण्ण धण्ण
नन्न बण्ण रंग हे
संग हे निसण्ण हे
चन्न हे नक्षी प्रमाणे



-  लक्ष्मीकांत



© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “Jagane.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Friday, March 7, 2014

भेळ


चारी बाज़ूंनी हिरवं खात ज़ाणाऱ्या सुरवंटासारखी रेल्वे चाललेली. कर्ज़त पासून लोणावळ्यापर्यंतचा सारा घाटाचा परिसर हिरव्याच्या अनेक छटांनी गच्च भरलेला. रिमझिम पावसात अनेक छोटे मोठे धबधबे येत जात होते. अनेक पाटांचे ओढे आणि पायऱ्यांनी अगदी मायकलॅंजेलोला लाज़वतील असे ओहोळ खळखळत होते. लोकल ट्रेनला कांहीही झालं तरी हे कॅरेक्टर येणं शक्य नाही. याचा अर्थ साऱ्या पॅसेंजर प्रेमानं जोजवलेल्या असतात असा नव्हे, पण एक संथ फ़ील असतो, ग्रॅंजर असतं. मघाशी सुटे नाहीत म्हणून हुकलेली भेळवाली परत आली. मी पाऊस पाण्याशी खेळत, दरी-झरे बघावे म्हणून आगऊ पणाने कासवासारखी मान आत बाहेर करत रेल्वेच्या दाराशी उभा होतो. "मस्सालाऽभ्येल" ह्या धावत्या हाकेवर "ए बाई" अशी हाक मारली आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं. सहसा मी आहो-जाहो शिवाय बोलत नाही.
पण ती बाई म्हणजे एखाद्या ऐस पैस तामिळी मंगाई सारखी! तिथूनच आली असेल इथं. साहावार इरकली लुगडं नेसून बोरमाळा आणि चित्ताक लेवून आलेली, भेळेच्या भडंगाइतकाच तिचा भडकदार अवतार. कपाळाला, डोक्याच्या जटांना टेकणारं लालभडक कुंकू आणि त्याच हलक्या हातानं ती मिरचीच्या सात पिढ्यांचा उद्धार करणारी भगवती भेळेत कालवून देत होती. माझ्यासाठी वरून खारवलेल्या आमसुलाचा त्या लाल जाळात मुरलेला एक तुकडा तीनं टाकला. एखाद्या केकवरच्या चेरीच्या तोंडात मारेल अशा थाटात तिने भेळेवर शेंगदाणे लावले आणि माझ्या हातात भेळ सुपुर्द केली. आहाहा... मला ओठ कातरायची सवय आहे, त्यावर हा भेळेचा बोकणा मरल्यावर मला, आग-आग आणि सूख-सूख एकदम झालं. बहुतेक आम्हाला असंच शिकवतात लाहानपणापासून म्हणून असेल. 
समोर हिरवं, काळ्यातनं दूधी वाहतय, तांबड्या इंजिनची-निळी ट्रेन आणि हातात भेळ, सगल्याचीच भेळ ! भेळेतला शेंगदाणा हा अलिकडच्या काळात तसा ज़रा दुर्लक्षिला गेलेला एलिमेंट आहे हे ज़ाणवलं. म्हणजे परवा मी पुण्यात मॉडर्न कॉलेज ज़वळ पांडूरंग भेळ म्हणून भेळ खाल्ली एकदम अव्वल करणावळ अगदी रंकाळ्याची आठवण झाली; तर त्या भेळेत सुद्धा टपोऱ्या शेंगदाण्यांचा भरघोस वाटा होता. मग ह्या साऱ्यावर गौड सारंग काफ़ी थाटात असावा की कल्याण थाटात असावा, का त्याला अगदी गौड कल्याण असं नांव देऊन त्यात असलेल्या किंवा नसलेल्या तुटपुंज्या सारंगाची हकालपट्टी करावी या गहन गंभीर विषयासारखीच भेळेतला शेंगदाणा ह्यावर पाक-विशारदांची कॉंन्फ़रन्स का होऊ नये? असा विचार आलाच.
नाही म्हटलं तरी तसं खाताना दुसरं कांही सुचणं अवघडच आहे म्हणा, पण गाताना गाणारे माघारी चर्चा करतात मग भरल्या पोटी ढेकर देत हिंग-मीरिच्या भपकाऱ्याबरोबर एकदोन स्टेट्मेंट्स करायला कांहीच हरकत नाही. बाकी पाक-विशारद हे ही "पोचलेल” असावेत. म्हणजे खादाड-खाबू नव्हेत तर, रातातुई मधल्या इगॉर सारखे केवळ निर्मम...! खाण्याला "सिरीयस जॉब" मानणारे. खाण्यासाठी खाणारे ढीग भेटतात. पूर्वीच्या आजी कॅटेगरीतल्या बायकांचे पेप्-टॉक्स त्यामानानं पाक-विषयांना धार्जिणे असायचे, आताच्या अज्ज्या म्हणजे अगदीच सीरीयल कूक किंवा मेजवानी वाल्या. पूर्वी आजी लोक बोलणार म्हणजे, दोन-दोन, तीन-तीन फ़ोडणीचे पदार्थ त्यांच्या-त्यांच्या आया-सासवान्नी कसे करू घातले आणि त्या कशा तयार झाल्या किंवा "आमच्या लहानपणी आप्पे किंवा फ़ड्ड नारळाच्या दुधातून कसे खायचे वर्सेस त्या अप्प्याच्या आंबवणात तुपावर परतून गूळ-खोबरं टाकूनच ते कसे बनवायचे" आणि आता (मेल्या) उडप्यांच्या हातचं खाऊन हे जुनं खाणं कसं विसरलेत लोक ह्याच्या खमंग चर्चा व्हायच्या. अरेरे... पण ज़ाणार हे सगळं. 




© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “Jagane.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.




हमनफ़ज़

नफ़्ज़ म्हणजे नाडी. हम नफ़्ज़ असणारि व्यक्ती कोणिही जिवलग व्यक्ती असू शकते, पण इथे रक्ताचं नाही, तरी सुद्धा श्वासांची लय आणि नाडीचा ठोका यांची लय सारखी आहे, पर्यायानं ह्रदयाचा ठोकाही. इथे रक्ताचं नातं नसंलं तरी हे नातं रक्तातल्या लयीशी जुळणारं आहे म्हणूनच रक्ताच्या नात्यांइतकंच अपरिहार्य आहे,
थोडं जास्तच म्हण हवं तर. ह्रदयाचं एकत्र धडधडणं हे शारिरिक संवेदनांचं Sharing आहेच त्या शारिरिक बदलांच्या पलिकडचं न सांगता कळणारं कुणितरी समजून घेत असतं असं अभवित पणे सूचित करणारं सुद्धा आहे.
दोन मनांत आणि शरिरात होणाऱ्या बदलांचं ते अंतर्यामि आणि बेमालूमपणे जुळलेलं स्पंदन आहे.

हमनफ़ज़ होना ख़ून का रिश्ता नही है ।
फ़िर भी पूरा ख़ून से जुडा हुआ है ॥





लक्ष्मीकांत बोंगाळे


Please Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “Jagane.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.