आतापर्यंत कित्येक आव्हानांना सामोरा गेला माणूस...
पण
आजपर्यंत पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न,
अस्तित्वाचा,
आयुष्याचा,
"जगण्याचा...!"

Tuesday, July 7, 2015

॥ रातराणी ॥
       माझी ती इच्छा आज पूर्ण झाली... मधे एकदा आईला बागेत उगाच आडव्या फोफावलेत्या एका झाडाबद्दल विचारलं होतं; आई म्हणाली “परवाच लावलीय रातराणी!”. हे ऐकण्या आधी मी, हे काय वाढलं आहे ते उपटून टाक आधी ह्या टोन मधे सांगायला गेलो होतो आणि रातराणी म्हटल्याबरोबर शरणागती. प्रजक्त, रातराणी, जाई-जुई, चाफ़ा; कांही केल्या ह्या झाडांचं आकर्षण टळतच नाही. दुर्गा भागवतांचा “दुपानी” या लेखसंग्रहात भरतीय मनाला असलेल्या ह्या सुगंधच्या वेडाबद्दल सुंदर लेख आहे.
       मधे एकदा ती रातराणी जरा फुलारली, वास येतो न येतो अशी! एरव्ही हा स्वभाव प्रजक्ताचा. पण प्रजक्त तेंव्हा जोरावर होता. आधीच आडदांड झुडूप ते, दिवसा बघितलं तरहे असलं रूक्ष झाड बागेत कोण कशाला लावेल असा प्रश्न पडावा आणि रात्री वेडावून सोडणाऱ्या वाऱ्यानं झोप उडवावी असं. त्या मानानं रातराणी हिरवीकंच असते, अत्यंत पाणीदार गर्द रंगाची. अगदी अंगाला हात लावू देत नाही. चुकुन माकून रातराणीच्या फांदीला हात लावून बाज़ूला करण्याचा प्रसंग आलाच तर हलक्याश्या धक्क्यानं मोडून हातात येते. राणीच ती, आम्हाला कशाला हात लावू देतेय?
       पण आज गेट मधून गाडी आत घेतोय तो रातराणीनं एकदम घेरलंच. वा! वा! वा! डोळे मिटून घेतले, तो, गंध ऊरभर पिऊन घेतला. दुसरं कांही सुचेचना! वेडावल्यासारखं झालं सगळ्या मित्र-मैत्रीणिंची आवर्जून आठवण झाली. त्यांनाही हा वास नक्कीच आवडला असता! समानधर्मी लोकांची कधी आठवण होईल हे सांगता येत नाही आणि कुठे नात्यांची सावली बोलून जाईल हेही. मला नेहमी असं वाटतं की प्रजक्त-रातराणी खूप नखरेल असतात. त्यांचा सुगंध साठवता येत नाही, आणि त्यांची नक्कलही करता येत नाही. रात्री फुलणाऱ्या ह्या फुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी पहावं तर त्यांच्यात अगदीच जीव नसतो. प्राजक्ताची फुलं बरी तरी दिसतात, पण रातराणी ? ती मोगऱ्याचं फूल काढल्यावर शिल्लक राहिलेल्या देठासारखी दिसते. ही असली रातराणी बघू नये, फक्त रात्रभर हुंगावी मनभर...!
       बकुळ कशी आठ-पंधरा दिवस टिकते, माळ सुकली तरी वास तसाच राहातो, पण तो वास असतो मात्र खूप कोरडा. रातराणीचा वास ओलसर असतो. हवेत आर्दता जास्त असताना ही फुलं उमलतात. ह्या वासानं वारा सुद्धा सुस्तीत फिरतो. उगाच धसमुसळेपणा कर, जोरानं वाहा हे त्याचे नेहमीचे चाळे कमी होतात. म्हणूनच रातराणी राज्य करते. म्हणूनच कदाचित मराठी कवितेत रातराणी आणि प्राजक्त रूपकांचे असंख्य साज़ लेवून वावरताना दिसतात. सुरेश भटांच्या दोन ओळींचा उल्लेख अनिवार्य आहे.
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा । रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ॥
       रात्रीचं गांभिर्य बळावत असताना रातराणी फुलते. प्रजक्त हा रात्रीचा बालसखा, तो कडूसं पडलं की घमघमायला लागतो पण रात्र जशी घनघोर होते तसा तिचा कब्जा रातराणीच्या ताब्यात जातो. इतर सगळे वास मागे पडतात. सगळ्या भावना मागे पडतात. आणि रातराणी रात्रीवर स्वार होते.
       सुगंध हा सुद्धा संस्कार आहे! बुधल्यात बंद रसायनांनी धुमसणाऱ्या सेंट्स चा वास आवडणाऱ्या लोकांना हा गंधाळलेपणा कदाचित रुचणार नाही. कृत्रिम वास किती दिवस टिकतो यावर श्रेष्ठ ठरतो पण निसर्ग मात्र ज़राशी सलगी करून, मग हुलकावण्या देत रहतो, खऱ्या-खुऱ्या आयुष्याचं रूपेरी देखणेपण आणि तीतकच खरं नश्वरतेच जीणं समजावत. अत्तंरं, पर्फ़्यूम्स आपण लावलेला सुगंध लोकांपर्यंत पोचावा म्हणून असतो. पण इथे रातराणी आपल्याला घेरून घेते, प्राजक्त मनाला मिठी मारतो! जाई-जुई हितगुज आठवायला भाग पाडतात, मरवा, चाफ़ा आपल्याला प्रीयजनांच्या जुन्या आठवणीत अलगद नेऊन सोडतात. मजा म्हणजे मला नेहमीच निसर्ग जवळ हवा असतो. घरात सुद्धा प्रत्येक गोष्टीत निसर्गाच्या प्रतिमांचा वावर असावा असं वाटतं. माझ्या बेडरूम मधे मला पाना फुलांचे, उजळ पडदे आवडतात. त्या पडद्यांना हेलाकावा देवूनच माझ्या खिडकीतून गार वारा येतो. हलकाच! दार उघडं असेल तर त्याला जोर असतो, दार बंद असताना मात्र तो अगदी दबक्या पावलांनी आत शिरतो. आणि मागोमाग हे गंधभारही, हातात एखादं पुस्तक घेउन खिडकीला लागून असलेल्या माझ्या खाटेवर मी उशीवर रेलून आडवा झालेला असतो, तेंव्हाचं ते सारं जगच निराळं असतं!
       त्यातही खंत एव्हडीच की ती रातराणी आणि प्राजक्त हॉल समोरच्या बागेत आहेत आणि मझ्या खोलीच्या खिडकीवर जूईचा वेल चढवलेला नाही, कारण तिथून आमची हद्द संपते... आता माझ्यासाठी शेजारी क्रूर वगैरे असतात, त्यांना भावनांची कदर वगैरे जाणीव नाही. मी हे आईला बोलून दाखवतो, “माणूसकी नाही साधी... बाकीचे अवयव कुठले असायचे?” असं उत्तर मिळतं! असो. बाकी हवं ते आहे, थोडं लांब का असेना, वास येतो तेव्हडा पुरे अजून जास्त अपेक्षा जरा जास्त होतील. हे म्हणजे प्रत्येक आवडलेल्या मुलीला मीठी मारता यावी किंवा सगळ्या मित्र-मैत्रिणिंनी मिळून एकच घर बांधून एकत्र राहावं या इतकीच ’अतिरेकी’ अपेक्षा ठेवल्यासारखं झालं.
       पण सुगंध येतोच आहे, अपेक्षाही ठेवायला काय जातं? पूर्ण न का होवोत - न होवोत अपेक्षा ठेवायला काय जातं? पूर्ण न व्हायच्या भितीनं स्वप्नं न बघण्यापेक्षा, न का होईनात पूर्ण पण स्वप्नं बघायला काय हरकत आहे? खिडकीतून फुलांचे पांढरे बिंदू न का चमकेनात पण त्यांचा वास तरी येतो. किती सुगंधी फुलं फुलतात? म्हणून घमघमाट थांबत नाही, फुलणं थांबत नाही! कधी कधी चंद्र जातो डोकावून खिडकीतून! बरं वाटतं. वर्षातून एक-दोनदा त्याला माझी आठवण होते, मग चांदणं सुद्धा आत येतं, रातराणीचा गंध माळून.
       मनात आठवणींचा थवा उतरतो... रात्र रात्र जागून काढलेली आठवते, अपरात्रीच्या गप्पा आठवतात. एकमेकांसाठी काय काय करायच्या थापा आठवतात, आणि अनेकदा नकळत एकमेकात गुंतून गेलेलं आठवतं! माझ्या एका अर्धवट राहिलेल्या कवितेत एक ओळ होती,
ओढ मोठी विचित्र असते,
कारण, ती नुसतीच असते
       साध्या साध्या गोष्टींनी किती फ़रक पडतो ते आठवतं, बरं वाईट सगळंच अशावेळी आठवतं.... अनेक माणसं जोडलेली आठवतात, कांही जिवलग म्हणून हितगुज करून निघून गेलेलीही आठवतात... कांही सोबतीला आहेत, कांही आपाल्या वाटेने निघून गेलेत... आपलं चुकलं, दुसऱ्यांचंही चुकलं; पण वेळ पाहून आपण त्यांना पोटाशी धरलं नाही, हे आपलंच चुकलं!

       पण तरीही आपली ओंजळ अगदीच रिकामी नाही! रातराणी सापडली नाही, प्राजक्त नाजूक असल्यानं हाती आला नाही, पण मोगऱ्याची एक-दोन फुलं हाती आली; ती ही कांही कमी नाहीत... हाती आलं ते आहेच, दूर आहे ते अजूनही गंधाळतय मनाला, आपल्या गालांना अलगद स्पर्षून जातंय! गार गंधभरल्या वाऱ्यासोबत येऊन केसांना कुरवाळून जातंय हे काय कमी आहे? रात्र आता भिनलीय! जागून काढली ती काढली आता मात्र ह्या खुळावणाऱ्या वासानं तिच्या मिठीत शिरायला जीव आतूर झालाय! तरीही, रात्री (की पहाटे?) साडेतीन-चारच्या सुमाराला, अजून कुठल्याच गंधवाऱ्याचा उन्माद ओसरला नसताना, गारठा वाढत जाऊन, रातराणी-प्राजक्ताची मिठी जराही सैल झाली नसताना मनात विचार येतो; खूप झाला वेडेपणा, वेळेवर झोपणं चांगलं!


No comments:

Post a Comment